आपले सर्वांचे आमच्या Np today या चैनल मध्ये मनःपूर्वक स्वागत.
नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पारंपारिक वारसा जपण्याचा आमचा छोटासा प्रयत्न...
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. सातपुडा ते नर्मदा काट तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणाचे वास्तविक व विश्वासहार्य असे वृत्त देण्याच्या आमचा प्रयत्न आहे. तसेच घटना घडामोडीसह, सकारात्मक व सक्सेस स्टोरी या माध्यमातून सर्वांना दाखविण्याचा प्रयत्न आहे.
कृपया चैनल ला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा ही नम्र विनंती.
धन्यवाद.
Np today
नाना पाटेकर : पडद्यावरचा कलाकार आणि पडद्यामागचा माणूस
लेखक : विश्लेषक रणजित राजपूत
चित्रपटसृष्टीत लोकप्रिय होणारे कलाकार अनेक असतात; पण प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे कलाकार मोजकेच असतात. नाना पाटेकर हे अशाच मोजक्या कलाकारांपैकी एक. त्यांच्याकडे पाहताना केवळ एक अभिनेता दिसत नाही, तर आयुष्याकडे अतिशय जवळून पाहिलेला, माणसाच्या सुख-दुःखाशी नाते जोडलेला संवेदनशील कलाकार दिसतो.
नाना पाटेकर यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा अभिनय कृत्रिम वाटत नाही. ते भूमिका साकारत नाहीत, तर ती भूमिका जगतात, अशी प्रेक्षकांची भावना होते. त्यांच्या आवाजातील चढ-उतार, संवादफेकीतील धार, डोळ्यांमधून व्यक्त होणाऱ्या भावना आणि चेहऱ्यावरचे सूक्ष्म बदल यामुळे त्यांच्या भूमिका लक्षात राहतात.
‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘अब तक छप्पन’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विविध छटा असलेल्या व्यक्तिरेखा साकारल्या. विशेषतः ‘नटसम्राट’मधील गणपतराव बेलवलकर ही भूमिका त्यांच्या अभिनयातील भावनिक सामर्थ्य दाखवून देते.
पण नाना पाटेकर यांच्याबद्दल लिहिताना माझ्या काही वैयक्तिक आठवणी मला विशेष महत्त्वाच्या वाटतात.
नंदुरबारला ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाच्या निमित्ताने नाना पाटेकर आले होते. आजच्या काळातील त्यांच्या मोठ्या प्रसिद्धीशी तुलना केली तर तो काळ वेगळा होता. त्या वेळी त्यांच्या कलेचे आणि अभिनयाचे मोल निश्चितच मोठे होते; मात्र आजच्या तुलनेत त्यांचे मानधनही कमी होते. त्या काळातील नाना आणि आजच्या काळातील नाना यांच्यामध्ये एक मोठा प्रवास आहे. त्या प्रवासात त्यांनी केवळ प्रसिद्धी मिळवली नाही, तर स्वतःच्या अभिनयाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली.
नंतर मुंबईत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाना पाटेकर यांच्याशी मला बोलण्याची संधी मिळाली. मोठा कलाकार जवळून भेटला की पडद्यावरची प्रतिमा आणि प्रत्यक्षातील व्यक्ती यामध्ये किती फरक असतो, याचा अनुभव येतो. नानांच्या बाबतीतही त्यांचे व्यक्तिमत्त्व जवळून अनुभवताना त्यांच्यातील संवेदनशील माणूस जाणवला.
त्या काळच्या माझ्या आठवणींमध्ये त्यांच्या मनातील अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्याबद्दलचे विशेष आकर्षणही ठसलेले आहे. माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाची आणि व्यक्तिमत्त्वाची त्यांना विशेष आवड होती, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे. कलाकारांच्या जगातही माणूस म्हणून जपलेल्या काही भावना किती सहज आणि निरागस असतात, याची ती एक आठवण आहे.
नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा स्पष्टवक्तेपणा. ते बोलताना लोकप्रियतेचा विचार करण्यापेक्षा आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याला महत्त्व देतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांवर चर्चा होते, मतभेदही होतात; मात्र त्यांचा सार्वजनिक संवाद नेहमीच लक्ष वेधून घेतो.
कलाकार म्हणून मिळालेली प्रसिद्धी त्यांनी सामाजिक प्रश्नांपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी वापरली नाही. शेतकरी, सैनिक, दुष्काळ, गरिबी आणि ग्रामीण भागातील सामान्य माणूस या विषयांबद्दल त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली आहे. गरजूंसाठी मदतीचे उपक्रम आणि सामाजिक कार्याशी असलेली त्यांची बांधिलकी यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू समोर येतो.
विशेष म्हणजे नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रसिद्धी आणि साधेपणा यांचा अनोखा संगम दिसतो. मोठ्या पडद्यावर हजारो लोकांच्या टाळ्या मिळवणारा कलाकार आणि त्याच वेळी सामान्य माणसाच्या दुःखाकडे संवेदनशीलतेने पाहणारा व्यक्ती—ही दोन रूपे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकत्र दिसतात.
आज चित्रपटसृष्टी बदलली आहे. अभिनयाच्या शैली बदलल्या, तंत्रज्ञान बदलले, चित्रपट निर्मितीचे स्वरूप बदलले. सोशल मीडियामुळे कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील अंतरही कमी झाले. मात्र अभिनयातील प्रामाणिकपणा आणि व्यक्तिरेखेशी एकरूप होण्याची ताकद यांचे महत्त्व आजही कायम आहे. नाना पाटेकर यांचा प्रवास या गोष्टीची आठवण करून देतो.
नंदुरबारच्या भूमीत ‘हमीदाबाईची कोठी’च्या निमित्ताने आलेला तो कलाकार आणि पुढे मुंबईत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त जवळून भेटलेला तोच नाना—या दोन्ही आठवणी माझ्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासातील दोन वेगवेगळे क्षण आहेत.
कलाकार मोठा होतो तो केवळ त्याला मिळालेल्या मानधनामुळे किंवा प्रसिद्धीमुळे नाही. तो मोठा होतो आपल्या कलेशी प्रामाणिक राहून आणि आपल्या व्यक्तिरेखांमधून समाजाच्या मनाला स्पर्श करून.
नाना पाटेकर यांचा प्रवास हेच सांगतो.
पडदा पडतो, दिवे लागतात, प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडतात; पण नाना पाटेकर यांनी साकारलेली एखादी व्यक्तिरेखा मनात कुठेतरी सुरूच राहते. हाच एका खऱ्या कलाकाराचा विजय असतो.
नाना पाटेकर हे केवळ अभिनय करणारे कलाकार नाहीत; ते माणसाच्या भावविश्वाला पडद्यावर शब्द, आवाज आणि चेहरा देणारे कलाकार आहेत.
— विश्लेषक रणजित राजपूत
1 week ago | [YT] | 5
View 1 reply
Np today
*डॉ.सुप्रियाताई गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड*
*नंदुरबार जिल्हा भाजपात उत्साह*
नंदुरबार - भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जमाती (ST) मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई विजयकुमार गावित यांची प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पार्टी अनुसुचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार(गडचिरोली) डॉ. देवराव एम. होळी आणि अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा आमदार योगेश सागर यांनी ही प्रदेश कार्यकारिणी घोषित केली असून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांना निवड केल्याचे पत्र दिले आहे. मराठवाडा, विदर्भ, ठाणे, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागातून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर एकूण 8 उपाध्यक्ष निवड करण्यात आले आहेत. डॉक्टर सुप्रियाताई गावित यांची उत्तर महाराष्ट्रातून प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल उत्तर महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांचे अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, नंदुरबार येथील खोडाई माता रोड वरील निवासस्थानी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील स्वागत आणि सत्कार करीत डॉक्टर सुप्रियाताई गावित व माजी खासदार डॉक्टर हिनताई गावित यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. याप्रसंगी नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा या सर्व तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर सुप्रियाताई गावित या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ कुमुदिनी गावित यांच्या कन्या आहेत, तर माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिनाताई गावित यांच्या लहान भगिनी आहेत. डॉ.
यांनी डॉक्टर विजयकुमार गावित व डॉक्टर हिनाताई गावित यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
2 months ago | [YT] | 23
View 2 replies
Np today
आभाळाच्या कॅनव्हासवर गुलमोहराचे रंग...
कडक उन्हाच्या झळा सोसल्यानंतर, आभाळातील ढगांच्या साक्षीने रक्तांबर परिधान करून बहरलेला गुलमोहर निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलवत आहे.
उन्हाळा संपताना आणि पावसाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर निसर्गाने केलेली ही रंगांची उधळण मनाला सुखावून जाते.
छाया : नितीन पाटील नंदुरबार
4 months ago | [YT] | 7
View 1 reply
Np today
*खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक*
नंदुरबार (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना संघटना अधिक सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेनेचे नेते, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा विधानसभानिहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसंवाद दौरा राज्यभर सुरू असून, शुक्रवार 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत. यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी देखील उपस्थित राहतील.
शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने संघटन बळकटीकरणावर भर दिला आहे. खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्रातील निवडणुकांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिंदेसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू असून, १६ मे ते १५ जुलै असे तब्बल दोन महिने चालणाऱ्या या व्यापक दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे पिंजून काढणार आहेत.
खा.श्रीकांत शिंदे यांच्या शिवसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने शुक्रवार,दि.5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत असल्याची माहिती शिवसेना नेते,आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. 5 जून रोजी सकाळी 10 वाजता तळोदा येथे शहादा तळोदा व धडगाव,अक्कलकुवा विधानसभा मतदार संघाची बैठक घेतील. दुपारी 1 वाजता नंदुरबार येथे नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा घेतील. त्यानंतर धुळ्याला प्रयान करतील.
बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन आ. चंद्रकांत रघुवंशी,आ.आमश्या पाडवी,शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख,माजी आ.शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी केले आहे.
*चौकट*
शिवसेनेचे संसदीय गटनेते,खा.श्रीकांत शिंदे 5 जून रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली असून, सर्व प्रमुख कार्यकर्ते,शाखाप्रमुख, पक्षाचे बीएलओ, जि.प,पंस सदस्य, नगरसेवक यांनी उपस्थित रहावे.बैठकीत खा.शिंदे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
*--- आ. चंद्रकांत रघुवंशी*
4 months ago | [YT] | 16
View 0 replies
Np today
अंगणवाडी सेविका बबिता रोशनराज पाडवी यांना पुणे येथे उल्लेखनीय कार्याबद्दल भारत श्री समाज रत्न पुरस्कार 2026 देताना. मा. मेघराज राजेभोसले अभिनेते निर्माता अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, मृणाल कुलकर्णी अभिनेत्री, नितीश घारे अभिनेता, साधी माणसं स्टार प्रवाह वरील रवीची भूमिका, डॉक्टर बी एन खरात उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे नातेवाईक व मित्र परिवारातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.
4 months ago | [YT] | 12
View 0 replies
Np today
एकलव्य विद्यालयाच्या अर्णव धुमाळने रचला इतिहास
इयत्ता दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात एकलव्य विद्यालयाचा विद्यार्थी अर्णव गौरीशंकर धुमाळ याने 100 टक्के गुण मिळवित नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच अशी कामगिरी करण्याचा इतिहास रचला आहे. त्याला गणित व संस्कृत या दोन्ही विषयात 100 गुण मिळाले आहेत. पलक बापू पाटील व तन्वी सिद्धार्थ बागुल ह्या विद्यार्थिनी 97% गुण मिळवून विद्यालयात द्वितीय आल्या तर अथर्व भूपेंद्र पाटील, दिव्यम सचिन कुमावत, क्षितिजा प्रदीप शिंपी व प्रांजल प्रवीण सावंत यांनी 96.60% मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांकाने येण्याचा मान मिळविला. कार्तिकी जकू गावित 96.40% मिळवून चतुर्थ तर कृपा जितेश मराठे हिने 96.20 % मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. विद्यालयाचा एकूण निकाल 99.46% इतका लागला असून 24 विद्यार्थ्यांना 95% च्या वर तर 126 विद्यार्थ्यांना 90% च्या वर गुण मिळाले आहेत.
एकूण 339 विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, माजी प्राचार्य सुहासिनी नटावदकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उप मुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.
5 months ago | [YT] | 21
View 1 reply
Np today
नंदुरबार : अक्षय तृतीये निमित्त पूर्वसंधेला बाजारपेठ फुलली ; उमर्दे येथे खंडेराव महाराज यात्रोत्सव...
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Np today
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
6 months ago | [YT] | 7
View 0 replies
Np today
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानाच्या मुजरा ; जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा.....
7 months ago (edited) | [YT] | 8
View 0 replies
Np today
7 months ago | [YT] | 5
View 0 replies
Load more