Follow My Social Media youtube.com/@hanumantbhopale
www.facebook.com/profile.php?id=100063538068845&am…
२) instgram : @hanumantbhopale
३) Teligram:
t.me/drhanumantbhopale
4) SUBSCRIBE : youtube.com/@hanumantbhopale
5) Mobile No : 9767704606
This channel is full of motivational videos.
Study methods, counselling, motivation, parasonality development, poem, positive thoughts
प्रेरणादायी विचार, व्यक्तिमत्त्वविकास
डॉ .हनुमंत मारोतीराव भोपाळे
Dr. Bhopale Hanumant Marotirao
hmbhopale@gmail.com
youtube.com/@hanumantbhopale
Hanumant Bhopale
आपल्या लेकरांच्या हाती रिकामी घागर येऊ नये म्हणून…
चला, समयदान आणि श्रमदानातून जलदीप लावू या!
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
“सर, पाऊस तर पडतो; पण उन्हाळ्यात पाणी राहत नाही. आम्ही करायचं तरी काय?”
या प्रश्नामागे काळजी आहे. पाण्यासाठी केलेल्या धावपळीचा थकवा आहे. डोळ्यांसमोर वाळणारे पीक, तहानलेली जनावरे आणि लेकरांच्या भविष्याची चिंता आहे.
अशा वेळी त्या माणसाला केवळ उपदेश करून चालणार नाही. आधी त्याची अडचण ऐकली पाहिजे. त्याच्या सोबत उभे राहिले पाहिजे. मग आपुलकीने विचारले पाहिजे—
“आपल्या गावात पडणारं पाणी आपल्या गावातच थांबावं, यासाठी आपण सगळे मिळून काय करू शकतो?”
पाऊस पडतो; मग पाणी जाते कुठे?
मित्रहो, नांदेड जिल्ह्यात वर्षाला सरासरी सुमारे साडेनऊशे मिलिमीटर पाऊस पडतो. तरीही अनेक गावांत पाणीटंचाई जाणवते. कुठे विहिरी तळ गाठतात. कुठे नळाच्या पाण्याची वाट पाहावी लागते. कुठे जनावरांसाठी पाणी आणताना माणसांची दमछाक होते.
आपल्या शिवारात पडलेले पाणी डोळ्यांसमोर वाहून जाते. काही महिन्यांनी आपण त्याच पाण्यासाठी वणवण करतो. हे चित्र आपल्या काळजाला बोचले पाहिजे!
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनीही पाणी गावात मुरविण्याचे महत्त्व ठामपणे मांडले आहे. तीनशे ते हजार मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या भागांत ते पाणी जाते कुठे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यातून पाणी अडविण्याची आणि जिरविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्या प्रश्नाचे उत्तर आपण आपल्या शिवारात शोधले पाहिजे.
केवळ तीनशे मिलिमीटर पावसातूनही एका हेक्टरवर सुमारे तीस लाख लिटर पाणी पडते. त्यातील सगळेच पाणी साठवता येणार नाही. प्रत्येक गावाची परिस्थितीही वेगळी असेल. पण योग्य जलव्यवस्थापनातून टंचाईची तीव्रता नक्की कमी करता येते.
पाऊस किती पडेल, हे आपल्या हातात नाही; पण पडलेले पाणी जपण्यासाठी हात पुढे करणे आपल्याच हातात आहे!
पुन्हा पावसाळा आला की आठवणार का?
या ठिकाणी मला माकडाची एक बोधकथा आठवते.
पावसाळा सुरू झाला की भिजणाऱ्या, थंडीने कुडकुडणाऱ्या माकडांना वाटायचे, “आपल्यालाही घर बांधायला हवं. पुढच्या पावसाळ्यात असा त्रास नको!”
पाऊस थांबला की ऊन पडायचे. अंग वाळायचे. खायला मिळायचे. मग घर बांधण्याचा विचार मागे पडायचा. हिवाळा गेला, उन्हाळा गेला. खाणे, फिरणे आणि दिवस ढकलणे यातच वेळ निघून जायचा.
पुन्हा पावसाळा आला की तीच धावपळ, तीच कुडकुड आणि पुन्हा तोच विचार—
“आपण घर बांधायला हवं होतं!”
मित्रहो, ही गोष्ट ऐकताना हसू येते. पण पाण्याच्या बाबतीत आपली अवस्थाही अशीच होत नाही ना?
उन्हाळ्यात विहीर आटली की वाटते, “पाणी अडवायला पाहिजे होतं!” पावसाळ्यात पाणी वाहताना दिसते, तरी काम पुढे ढकलले जाते. काही महिन्यांनी पुन्हा टंचाई आणि पुन्हा तीच हळहळ!
संकट आले की संकल्प करायचा आणि संकट ओसरले की संकल्प विसरायचा—हे चक्र आता थांबवू या!
देवाने पाऊस दिला; आपण त्याचे काय केले?
आणखी एक काल्पनिक बोधकथा सांगतो.
पाणीटंचाईच्या चिंतेने अस्वस्थ झालेल्या एका माणसाला स्वप्न पडले. स्वप्नात तो परमेश्वराला म्हणाला—
“देवा, आमच्या गावावर पाण्याचं एवढं संकट का आलं? आताच पाणी कमी पडतंय, पुढचे महिने कसे जातील? या चिंतेने झोप लागत नाही. पाखरांच्या चोचीत पाण्याचा थेंब कसा जाईल? जनावरांची तहान कशी भागेल? माझ्या लेकरांना पाणी कुठून आणू? शेतातलं पीक डोळ्यांसमोर वाळतंय!
आम्ही रोज तुझी आरती करतो. कीर्तने करतो. भंडारे घालतो. तुला पाण्याचा, दुधाचा, तुपाचा अभिषेकही करतो. तरी आमच्यावर हे संकट का?”
परमेश्वराने शांतपणे विचारले—
“वत्सा, तुझ्या गावात पाऊस पडला होता ना?”
“हो देवा, पडला होता.”
“ते पाणी वाहून जाताना तू पाहिलं होतंस ना?”
“हो, पाहिलं होतं.”
“मग ते अडविण्यासाठी, जमिनीत मुरविण्यासाठी तुम्ही एकत्र येऊन काय केलं?”
तो माणूस निरुत्तर झाला.
आता परमेश्वराचा आवाज करारी झाला—
“भक्ता, किती दिवस असा माझ्यासमोर टाळ्या वाजवत बसणार आहेस? किती दिवस या हातांनी फक्त पूजा करत बसणार आहेस?
हे हात मी तुला कशासाठी दिले? फक्त टाळ्या वाजवण्यासाठी? फक्त आरतीचे ताट फिरवण्यासाठी?
नाही रे! हे हात कुणाच्या तरी मदतीला येऊ दे. कुणाचे अश्रू पुसू दे. कुणाची तहान भागवू दे. कुणाच्या पडक्या घराला आधार देऊ दे!
माझ्यावर पाण्याचा अभिषेक करू नकोस. तो अभिषेक काळ्या माईच्या गर्भावर कर! पावसाचे पाणी अडव, ते जमिनीत मुरव. काळी माई ते पाणी आपल्या पोटात जपून ठेवील. उन्हाळ्यात तुझ्या लेकरांच्या ओठांपर्यंत, तुझ्या जनावरांच्या तोंडापर्यंत आणि तुझ्या पिकांच्या मुळांपर्यंत ती माय तेच पाणी परत देईल.
माझ्या मूर्तीवर वाहिलेले पाणी क्षणात वाहून जाते. पण मातीच्या कुशीत जिरवलेले पाणी पिढ्यान्पिढ्या जीव जगवते!”
परमेश्वर क्षणभर थांबला. मग त्याने थेट डोळ्यांत पाहत विचारले—
“जनसेवा हीच ईश्वरसेवा, हे किती संतांनी तुला सांगितलं रे!
तुकोबाराय सांगून गेले, ‘जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले; तो चि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा.’ गाडगेबाबांनी भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यायला सांगितलं. किती संतांनी किती वेळा सांगितलं…
मग हे तुझ्या लक्षात का येत नाही?
तू देवाला कवटाळतोस आणि माणसाला टाळतोस!
माझ्या मंदिराच्या पायऱ्या झिजवतोस, पण शेजारच्या घरात चूल पेटली की नाही, हे पाहायला तुला वेळ नाही. माझ्या दर्शनासाठी रांगेत तासन्तास उभा राहतोस, पण गावाच्या कामासाठी एक तास द्यायला तुझ्याकडे वेळ नाही.
देवावर प्रेम आणि माणसाचा द्वेष, हे कसलं रे भक्तीचं रूप?
भक्ता, हे चित्र तू बदलून टाक!”
तो माणूस थरथरला. त्याचे हात आपोआप जोडले गेले. पण यावेळी ते जोडलेले हात टाळ्या वाजवण्यासाठी नव्हते; ते संकल्पासाठी होते.
“मग देवा, आता मी काय करू?”
“उठ! गावकऱ्यांशी बोल. जाणकारांचे मार्गदर्शन घे. श्रमदानासाठी पुढे ये. काळ्या माईची ओंजळ पाण्याने भर. तुझ्या लेकरांच्या उद्याच्या पाण्यासाठी आज काम कर. माणसात मला शोध; मातीत मला पाहा. तिथेच मी तुला भेटेन!”
मित्रहो, ही बोधकथा आहे; पण तिच्यातले प्रश्न आपल्या प्रत्येकाला उद्देशून आहेत—
आपण मागत असलेल्या कृपेला आपल्या कृतीची जोड देत आहोत का?
देवाच्या मूर्तीवर अभिषेक करणारे आपण, काळ्या माईच्या गर्भावर जलाभिषेक कधी करणार?
टाळ्या वाजवणारे आपले हात, गावाच्या कामासाठी कधी पुढे येणार?
माणसांना समजून घेऊ या; हाताशी जोडू या!
“सर, लोक आले नाहीत तर? काहींनी शंका घेतल्या तर?”
एखादी व्यक्ती बैठकीला आली नाही, म्हणजे ती विरोधात आहे असे समजू नका. तिच्या अडचणी असू शकतात. कुणाला काम नीट समजले नसेल. कुणाच्या मनात पूर्वानुभवामुळे भीती असेल.
एखादा शेतकरी विचारेल, “पाणी अडवल्याने माझ्या शेताचं नुकसान तर होणार नाही ना?”
त्याची शंका ऐकू या. त्याला विश्वासात घेऊ या. संबंधितांची संमती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच योग्य काम ठरवू या.
आधी जलप्रबोधन, मग जलसंधारण! विश्वासातूनच लोकसहभाग उभा राहतो.
राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजारसारख्या गावांनी लोकसहभागातून जलसंधारणाची दिशा दाखविली. हिवरेबाजारमध्ये उपलब्ध पाण्याच्या हिशोबानुसार शेतीचे नियोजन करण्यावर भर दिला गेला. या अनुभवांतून आपण शिकले पाहिजे.
काटकळंबा येथे कामांची पाहणी करताना कार्यकर्त्यांची तळमळ मला अनुभवता आली. नागदरवाडीतील प्रयत्नांचाही अभ्यास व्हायला हवा. दुसऱ्या गावाचे कौतुक करताना आपल्या मनातही हा विचार रुजला पाहिजे—
“आपल्या गावासाठी आपणही एकत्र येऊ या!”
माझा वेळ देत आहे; आपणही थोडा वेळ द्याल ना?
याच भावनेतून माझ्या दरेगावात यावर्षीपासून ‘जलदीपाची दीपावली’ हा उपक्रम सुरू करीत आहे. गेली अठ्ठावीस वर्षे ‘ज्ञानदीपाची दीपावली’च्या माध्यमातून ज्ञान आणि संस्कारांचा प्रकाश पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आता या उपक्रमाच्या एकोणतिसाव्या वर्षी या प्रवासाला जलसमृद्धीच्या प्रयत्नांची जोड देत आहे.
स्वखर्चाने गावोगावी फिरत आहे. जलप्रबोधन बैठका घेत आहे. नागरिकांशी संवाद साधत आहे.
माझ्या गावासाठी आणि आपल्या सर्वांच्या गावांसाठी मी माझा वेळ, माझे दिवस देत आहे. आपणही आपल्या गावासाठी थोडा तरी वेळ देण्याचा विचार कराल ना?
प्रत्येकाला मोठे काम करता येईलच असे नाही. प्रत्येकाला शारीरिक श्रम करणेही शक्य नसेल. पण कुणी लोकांना जोडू शकते. कुणी नियोजनात मदत करू शकते. कुणी मार्गदर्शन करू शकते. कुणी कामांच्या नोंदी ठेवू शकते.
कुणाचा एक तास, कुणाचे दोन हात, कुणाचे मार्गदर्शन आणि कुणाचे सातत्य—यातूनच गावाच्या जलसमृद्धीचा पाया घातला जाईल.
काम उभारू या; आणि ते जपूही या!
कामाबरोबर त्याची देखभालही करू या. बंधारा बांधल्यानंतर त्याची काळजी घेऊ या. झाड लावल्यानंतर ते जगविण्याची जबाबदारी स्वीकारू या.
गावातील पाण्याचा हिशोब ठेवू या. पिण्यासाठी, जनावरांसाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे नियोजन करू या. पूर्ण झालेली कामे, विहिरींच्या पाणीपातळीतील बदल आणि जगलेल्या झाडांची नियमित नोंद ठेवू या.
आपल्या जाण्यानंतर गावाला काय आठवावे?
मित्रहो, एक दिवस आपल्यालाही या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आपल्या गावातून आपलीही अंत्ययात्रा निघणार आहे.
त्या दिवशी मागे काय उरणार?
“गावासाठी धावून येणारा माणूस गेला,” असे कुणाला वाटेल का?
“याने लावलेल्या झाडाची सावली आजही आहे,” असे कुणी म्हणेल का?
“पाण्याच्या कामासाठी हा नेहमी पुढे असायचा,” अशी आठवण कुणाच्या मनात असेल का?
आपली आठवण निघाली की माणसांच्या डोळ्यांत आपुलकीचे अश्रू यावेत, इतका तरी जिव्हाळा आपल्या कृतीतून पेरू या.
“चांगल्या कामात अडथळे आणणारा माणूस गेला,” अशी सुटकेची भावना कोणाच्या मनात निर्माण होऊ नये. त्यासाठी मोठे पद किंवा मोठे नाव आवश्यक नाही. दुसऱ्याच्या प्रयत्नांना साथ देणारे मन हवे.
आजवर जमले नसेल, तरी स्वतःला दोष देत बसू नका. आजपासून सुरुवात करू या. एखादी छोटी जबाबदारी स्वीकारू या.
आपण गावाकडून खूप काही घेतले आहे. आता गावाला आपल्या वेळेतील थोडासा वाटा देऊ या!
लेकरांच्या उद्यासाठी आजचे हात
मित्रहो, आपल्या लेकराला तहान लागली की आपण हातातले काम बाजूला ठेवून त्याला पाणी देतो. उद्या त्याच लेकराला पाण्यासाठी भटकावे लागू नये, म्हणून आज थोडा वेळ आपल्या मातीसाठी देऊ या.
आपल्या लेकरांच्या हाती रिकामी घागर येऊ नये म्हणून आज आपल्या हातांनी काळ्या माईच्या गर्भावर जलाभिषेक करू या!
🪔 श्रमदानाचे आवाहन 🪔
‘जलदीपाची दीपावली’ श्रमदान
📅 ४ व ५ नोव्हेंबर २०२६
📍 दरेगाव, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड
सहभागासाठी आपले पूर्ण नाव आणि गाव ९७६७७०४६०४ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा.
शक्य असेल तर आपल्या सोबत आणखी एका व्यक्तीलाही या कार्याशी जोडा.
टाळ्या वाजवणाऱ्या हातांना आता श्रमाची सवय लावू या.
देवाला कवटाळताना माणसालाही जवळ करू या.
समयदान आणि श्रमदानातून गावोगावी जलदीप उजळू या!
– प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
आपण सुरक्षित असावं म्हणून…!
ते असुरक्षिततेचा सामना करतात...
वंदन कर्तव्यनिष्ठ पोलिसांना
मित्रहो, संकट निर्माण झालं की श्रद्धाळू माणसं देवाचा धावा करतात. ‘‘कृष्णा, धाव रे लवकरी…’’ अशी आर्त हाक मारतात. संकट दूर करावं, आपल्या मदतीला धावून यावं, अशी प्रार्थना करतात.
श्रद्धा माणसाला मानसिक आधार देते. पण संकटाच्या ठिकाणी प्रत्यक्ष धावून येणाऱ्या माणसांचीही आपल्याला जाणीव असायला हवी. कुणावर हल्ला झाला, कुणाच्या जिवाला धोका निर्माण झाला, कुणी धमकावलं, तर आपण लगेच म्हणतो, ‘‘पोलिसांना बोलवा!’’
का बरं पोलिसांची आठवण होते?
कारण ते येतील, आपल्याला मदत करतील, संकटातून बाहेर काढतील, असा विश्वास आपल्याला वाटतो. आपल्या संकटाच्या वेळी ज्यांची आठवण होते, त्यांच्या कार्याचं महत्त्व आपल्या जगण्यात किती मोठं आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
आपण रात्री निर्धास्त झोपतो. पण कुठंतरी पोलीस जागे असतात. आपण सण साजरे करतो. आपल्या घरात माणसं एकत्र येतात. गोडधोड जेवण होतं. त्याच वेळी पोलीस रस्त्यावर उभे राहून बंदोबस्त करत असतात.
त्यांनाही वाटत असेल ना, आपल्या मुलांसोबत बसावं? आई-वडिलांशी निवांत बोलावं? कुटुंबासोबत सण साजरा करावा?
पण प्रत्येक वेळी ते शक्य होत नाही. आपल्या आनंदाला सुरक्षिततेची साथ देताना त्यांना स्वतःच्या आनंदाला अनेकदा मुरड घालावी लागते.
मित्रहो, काही प्रसंग तर असे असतात की पोलीस संकटाच्या ठिकाणी जागा असतो आणि त्याच्या काळजीने त्याची पत्नी, आई-वडील, मुलंबाळं घरी जागी असतात.
तो लोकांच्या सुरक्षिततेसाठी झटत असतो. घरचे त्याच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत असतात.
‘‘जेवण झालं का?’’
‘‘तुम्ही सुरक्षित आहात ना?’’
‘‘घरी कधी येणार?’’
हे केवळ प्रश्न नसतात. त्या प्रश्नांत काळजी असते. प्रेम असतं. मनात दडलेली भीती असते. कधी फोन करावासा वाटतो; पण कामात असतील, म्हणून घरचे स्वतःला थांबवतही असतील.
महिला पोलिसांचा विचार केला की त्यांच्या सुरक्षिततेचीही विशेष काळजी वाटते. त्या धैर्याने, समर्थपणे आपलं कर्तव्य बजावत असतात. रात्रीची गस्त, गर्दीचा बंदोबस्त, तणावाचा प्रसंग—अशा कितीतरी जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यात घरच्या जबाबदाऱ्यांचाही विचार मनात असतो.
घरी लहान मूल असेल तर ते आईची वाट पाहत असेल. मूल आजारी असेल तर कर्तव्य बजावत असतानाही मन पुन्हा पुन्हा घराकडे धावत असेल. अशा वेळी कुटुंबाची साथ आणि कामाच्या ठिकाणी मिळणारा समजूतदारपणा किती महत्त्वाचा असतो!
मित्रहो, डॉक्टर आपल्याला सांगतात, ‘‘वेळेवर झोपा. वेळेवर जेवण करा. आरोग्याची काळजी घ्या.’’
हा सल्ला योग्यच आहे. पण दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी धावणाऱ्या डॉक्टरांनाही प्रत्येक वेळी स्वतःच्या जेवणाची, झोपेची वेळ पाळता येतेच असं नाही. कधी रात्रपाळी, कधी दिवसपाळी. समोर गंभीर रुग्ण आला, तर हातातला घास बाजूला ठेवून त्याचा जीव वाचवण्यासाठी धावावं लागतं.
पोलिसांच्याही जगण्यात असे प्रसंग येतात.
जेवायला बसले आणि तातडीचा निरोप आला, तर ताटावरून उठावं लागतं. विश्रांतीची गरज असतानाही गंभीर प्रसंग उद्भवला, तर पुन्हा कर्तव्यावर जावं लागतं. समोर एखाद्याचा जीव धोक्यात असताना स्वतःची भूक, तहान, थकवा मागे पडतो.
पण त्यांच्या त्यागाचं कौतुक करताना त्यांची भूक, झोप आणि विश्रांती यांचं महत्त्व आपण विसरता कामा नये. त्यांनाही शरीर आहे. मन आहे. थकवा येतो. आधाराची गरज असते.
पोलीस म्हणजे केवळ गणवेश नव्हे. त्या गणवेशातही आपल्यासारखाच माणूस असतो. त्यालाही भावना असतात. घरच्या अडचणी असतात. तरीही त्या सांभाळत तो समाजाच्या सुरक्षेसाठी उभा असतो.
याचा अर्थ पोलिसांच्या चुका दुर्लक्षित कराव्यात, असा नाही. चुकीच्या वागण्याबद्दल प्रश्न विचारलेच पाहिजेत. पण एखाद्याच्या चुकीवरून प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या सर्वांचं योगदान नाकारणंही योग्य नाही.
आपण काय करू शकतो?
नियम पाळू शकतो. अफवा पसरवणं टाळू शकतो. अडचणीच्या वेळी योग्य माहिती देऊ शकतो. विनाकारण वाद घालण्याऐवजी सहकार्य करू शकतो. चांगल्या कामाबद्दल मनापासून धन्यवाद देऊ शकतो.
आपला एक समजूतदार शब्दही दिवसभराचा ताण सहन करणाऱ्या माणसाला आधार देऊ शकतो.
२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाखमधील दुर्गम भागात मातृभूमीचं रक्षण करताना भारतीय पोलीस दलातील शूर जवानांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करण्यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो.
मित्रहो, या दिवशी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांना अभिवादन करताना त्यांच्या कुटुंबीयांचंही स्मरण करू या. त्यांच्या घरातल्या माणसाची उणीव आपण भरून काढू शकत नाही. पण त्यांच्या त्यागाविषयी कृतज्ञता आणि संवेदनशीलता नक्कीच बाळगू शकतो.
आपल्या घरातली माणसं सुरक्षित राहावीत म्हणून स्वतःच्या घरच्यांना काळजीत ठेवून कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलिसांना सलाम! कर्तव्य बजावताना प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला कृतज्ञतापूर्वक वंदन!
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
वक्ता, समुपदेशक, यूट्यूबर तथा व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ
मोबाईल 9767704604
2 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Hanumant Bhopale
ज्ञानदीपानंतर आता ‘जलदीप’; जलसंवर्धनासाठी पुढाकार
गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात अडवून जिरवण्याचे डॉ. हनुमंत भोपाळे यांचे आवाहन
दरेगाव, ता. नायगाव (खै.), जि. नांदेड : ‘‘गावातले पाणी गावात आणि शेतातले पाणी शेतात अडवून जिरवू शकलो, तर भूजलपातळी वाढवण्यास आणि दुष्काळाची तीव्रता कमी करण्यास मदत होईल. यासाठी ‘जलदीप’ प्रकल्पाच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न करू या,’’ असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ‘ज्ञानदीपाची दीपावली’ उपक्रमाचे संकल्पक प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले.
‘जलदीप’ प्रकल्पांतर्गत गावांमध्ये व शेतांमध्ये योग्य ठिकाणी शोषखड्डे आणि भूजल पुनर्भरणाच्या रचना उभारणे, तांत्रिक मार्गदर्शनाखाली पावसाळ्यात विहिरींचे पुनर्भरण करणे, आवश्यक परवानगी व नियोजनासह पाझर तलावांतील गाळ श्रमदानातून काढणे, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. हा प्रयत्न केवळ दरेगावपुरता मर्यादित न ठेवता इतर गावांमध्येही जलसंवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
‘‘गेल्या २९ वर्षांपासून ‘ज्ञानदीपाची दीपावली’च्या माध्यमातून प्रबोधनाचे काम करत असतानाच दरेगावची शाळा उत्कृष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. घरोघरी आणि मनामनांत ज्ञानाचा दीप उजळावा, ही या उपक्रमामागची भूमिका राहिली आहे. आता त्याच भावनेतून गावागावांत आणि शेताशेतांत ‘जलदीप’ उजळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे,’’ असे डॉ. भोपाळे यांनी सांगितले.
पाणीटंचाईचे संकट केवळ चर्चा करून दूर होणार नाही; त्यासाठी प्रत्येकाने कृतीतून योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘‘भूजलपातळी खालावणे हे मानवजातीसमोरील गंभीर संकट आहे. या संकटाची चाहूल लागल्यानंतरही आपण जागरूक झालो नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पावसाचा प्रत्येक थेंब जपणे आणि जमिनीत मुरवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,’’ असे ते म्हणाले.
‘‘ज्ञानासाठी ज्ञानदीप आणि पाण्यासाठी जलदीप—या दोन्हींच्या माध्यमातून गावाचे भविष्य उजळवू या,’’ असे सांगत नागरिक, शेतकरी, युवक, महिला आणि जलसंवर्धनासाठी काम करू इच्छिणाऱ्या सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे यांनी केले.
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
चला, ज्ञानदीपाबरोबर जलदीपही लावू या!
आपण आपल्या गावात, वनात आणि शिवारात पडणारे पावसाचे पाणी वाया घालवतो का? की ते वाया जाऊ देतो?
पाणी वाया घालवू नये, वाहून जाऊ नये, म्हणून आपण काय तरतूद करतो? पावसाचे पाणी साठवण्यासाठी, जमिनीत मुरवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करतो का?
खरं तर हा विषय केवळ पाणी वाया घालवण्याचा किंवा वाया जाऊ देण्याचाच नाही. हा विषय आहे पाण्याचे महत्त्व समजून घेण्याचा, इतरांनाही समजावून देण्याचा आणि त्या जाणिवेतून कृती करण्याचा!
काही दिवस खिशात पैसे नसतील, तरी आपण जगू शकतो; पण पाणीच नसेल, तर जगू शकतो का?
मित्रांनो, समजा उद्या पैशांचा पाऊस पडणार आहे, असे आपल्याला कळले तर?
आपण तो पैसा साठवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करू. भांडी आणू, पोती आणू, जागा तयार करू. जास्तीत जास्त पैसा आपल्याला कसा साठवता येईल, याचा विचार करू!
तेव्हा आपण असे म्हणू का, “शासन करेल, प्रशासन करेल, एखादा समाजसुधारक करेल… मला काय त्याचं?”
नाही ना? आपण स्वतः पुढाकार घेऊ!
मग पैशांपेक्षाही महत्त्वाचे असलेले पावसाचे पाणी साठवताना आपण दुसऱ्याची वाट का पाहतो?
पैसा देऊन पाणी विकत घेता येते; पण त्यासाठी कुठेतरी पाणी उपलब्ध असावे लागते ना! पाणीच उपलब्ध नसेल, तर खिशातल्या पैशांनी तहान भागेल का?
पावसाचा प्रत्येक थेंब हे जीवनाचे धन आहे. हे मोल आपल्या मनात रुजले, तर आपण पाण्याची बचत करू, पाणी साठवू आणि जमिनीत मुरवण्यासाठीही पुढाकार घेऊ.
शासन आणि प्रशासनाने त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजेच; त्याचबरोबर आपणही आपल्या वाट्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
तहान लागल्यानंतर पाण्याचे महत्त्व सांगावे लागत नाही. पण पाणी सहज उपलब्ध असतानाही त्याचे मोल जाणता आले पाहिजे.
‘तहान लागली की विहीर खोदायची’ हा प्रकार आपण किती काळ करत राहणार आहोत? दुष्काळ पडला की आपण खडबडून जागे होतो. पाण्यासाठी धावपळ करतो. पाऊस पडला की मात्र पुन्हा निर्धास्त होतो! पुढच्या उन्हाळ्याची काळजी पुढच्या उन्हाळ्यात करू, असे कसे चालेल?
तहान लागण्यापूर्वीच विहिरीची काळजी घ्यायला हवी. दुष्काळ पडण्यापूर्वीच पाणी साठवायला हवे!
जमिनीतून आपण पाणी उपसतो; पण जमीन म्हणजे पाणी तयार करणारा कारखाना नाही. जमिनीत मुरलेले पाणीच भूजलसाठ्याला भर घालते. आपण पाणी उपसत राहिलो आणि ते मुरवण्याची व्यवस्था केली नाही, तर हा साठा टिकणार कसा?
वेळीच सावध झालो नाही, तर पाणीटंचाईचे परिणाम केवळ माणसांपुरते मर्यादित राहणार नाहीत. पशुपक्ष्यांचे जगणे कठीण होईल. झाडे सुकतील. शेती अडचणीत येईल. माणसांचे आरोग्य आणि उपजीविकाही धोक्यात येईल. तीव्र पाणीटंचाईमुळे गावे ओस पडण्याची आणि जिथे पाणी मिळेल तिथे स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते.
पर्यावरणातील हे परस्परावलंबन आपण समजून घेतले पाहिजे. पशुपक्षी, झाडे, जमीन आणि माणूस यांच्या जगण्याचे धागे एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यातील एक धागा तुटला, तरी परिणाम इतरांवर होतोच.
अशी वेळ येऊ नये, म्हणून आम्ही प्रयत्न करण्यासाठी पुढे आलो आहोत.
पाण्याची बचत करणे, पावसाचे पाणी साठवणे, ते जमिनीत मुरवणे, साठवणुकीसाठी योग्य जागा तयार करणे आणि अस्तित्वात असलेल्या जलसाठ्यांची दुरुस्ती व देखभाल करणे—या कामांसाठी आम्ही पुढाकार घेण्याचा संकल्प केला आहे.
या कार्याची सुरुवात नांदेड जिल्ह्यातील नायगाव (खै.) तालुक्यातील दरेगाव येथे करणार आहोत.
स्थानिक गरजा समजून घेऊन, योग्य तांत्रिक मार्गदर्शन घेऊन आणि गावकऱ्यांच्या सहभागातून हे काम पुढे न्यायचे आहे.
आमचा प्रयत्न छोटा आहे. त्या बोधकथेतील चिमणीसारखा!
एका जंगलाला आग लागली होती. आगीपासून जीव वाचवण्यासाठी पशुपक्षी पळत होते. एक चिमणी मात्र आपल्या चोचीत मावेल एवढे पाणी आणून आगीवर टाकत होती. पुन्हा पाणी आणत होती. पुन्हा आगीवर टाकत होती.
हे पाहून पळणाऱ्या हत्तींच्या कळपातील एक हत्ती तिला म्हणाला,
“अगं चिमणे, तुझ्या चोचीतल्या एवढ्याशा पाण्याने ही आग विझणार आहे का?”
चिमणी म्हणाली,
“माझ्या चोचीतल्या पाण्याने किती आग विझेल, हे मला माहीत नाही. माझा प्रयत्न छोटा असला, तरी माझी भावना मोठी आहे. या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा माझे नाव आग लावणाऱ्यांच्या किंवा निष्क्रिय राहणाऱ्यांच्या यादीत नसेल. आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या यादीत असेल!”
ही बोधकथा आम्हाला प्रेरणा देते.
आपण एकटे किती करू शकतो, असा प्रश्न विचारून थांबण्यापेक्षा आपल्याला जेवढे शक्य आहे, तेवढे तरी करू या! एका चिमणीचा प्रयत्न छोटा असेल; पण तिच्या प्रयत्नातून इतरांना प्रेरणा मिळाली, तर मदतीचे अनेक हात पुढे येऊ शकतात.
आमच्या या छोट्याशा प्रयत्नातूनही गावोगावी प्रेरणा पोहोचावी. जलसंवर्धनासाठी माणसे जोडली जावीत. व्यापक जलचळवळ उभी राहावी, ही आमची भावना आहे.
आपण बघ्याची भूमिका न घेता सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आपणास नम्र आवाहन आहे.
आपण वेळ देऊ शकता. श्रमदान करू शकता. आपले ज्ञान, कौशल्य आणि अनुभव या कामासाठी देऊ शकता. इतरांना सहभागी होण्यासाठी प्रेरित करू शकता.
या जलसंवर्धन कार्यासाठी एक-दोन दिवस श्रमदान करू इच्छिणाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपल्या श्रमातून गावाच्या जलसमृद्धीला हातभार लावू या!
या कार्यात श्रमदान करणाऱ्यांना ‘श्रमवीर’ म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
आपल्या गावासाठी, शिवारासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी केलेले हे काम देशसेवेचेच काम आहे. जलसंवर्धनातील आपला सहभाग हीसुद्धा देशभक्तीची कृती ठरेल!
या कार्यात आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
चला, तर मग संघटित होऊ या…
पावसाचा थेंब जपू या…
ज्ञानदीपाबरोबर जलदीपही लावू या!
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक, यूट्यूबर, व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
📞 9767704604
✉️ hanumantbhopale@gmail.com
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
रावण जाळायलाच हवा… पण आपल्या आतलाही!
दसऱ्याच्या दिवशी रावण जाळायला हवा… पण रावण म्हणजे केवळ रामायणातील दहा तोंडांचे पात्र एवढाच अर्थ घ्यायचा का?
आपल्या आतल्या वाईट विचारांचे, अहंकाराचे, द्वेषाचे प्रतीक म्हणूनही रावणाकडे पाहायला हवे.
माणसं रावणदहन बघायला जातात. तिथे रावणाच्या पुतळ्याचे दहन होते. आपण ते पाहतो; पण आपल्या आतला रावण जाळायचा मात्र विसरून जातो!
राग, अहंकार, द्वेष, मत्सर, मोह आणि चिडचिड यांच्या आहारी जाण्याची वृत्ती आपण जाळली नाही, तर ती आपल्यालाच जाळत राहते. आपली मनःशांती हिरावून घेते. नात्यांमधला गोडवा कमी करते. आपल्या वागण्यामुळे आपणही दुखावतो आणि इतरांनाही दुखावतो.
रामायणातील रावणाने आपल्या मोहाला, अहंकाराला आणि रागाला वेळीच आवर घातला असता, तर पुढचा विनाश टळला नसता का? त्याचे राज्य, कुटुंब आणि स्वतःचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले नसते का?
या कथेतून आपल्या जगण्यासाठीही काही शिकायला हवे ना?
रावणदहनाकडे केवळ पाहण्याचा कार्यक्रम म्हणून न बघता स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रेरणा म्हणून पाहू या. आपल्या दुर्गुणांमुळे स्वतःचे आणि इतरांचे जीवन दुःखी होऊ नये, यासाठी जागरूक होऊ या.
पण एक गोष्ट समजून घ्यायला हवी. वाईट भावना जाळणे म्हणजे भावना दडपून ठेवणे नव्हे! राग किंवा मत्सर वाटला म्हणून आपण वाईट माणूस ठरत नाही. मात्र, त्या भावनेच्या आहारी जाऊन आपण काय बोलतो, कसे वागतो, याचे भान ठेवायला हवे.
राग आला, तर तो का आला हे समजून घेऊ या. अपशब्द बोलण्याऐवजी आपले म्हणणे शांतपणे मांडू या. मत्सर वाटला, तर दुसऱ्याचे वाईट चिंतण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू या. अहंकार डोके वर काढू लागला, तर आपल्याला घडवणाऱ्या आणि संकटात साथ देणाऱ्या माणसांची आठवण करू या.
भावनेला समजून घेऊन योग्य कृती निवडणे, हाच स्वतःवरचा विजय आहे!
केवळ पुतळा जाळून आपल्या स्वभावात बदल होणार नाही. त्यासाठी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावे लागेल. चूक मान्य करावी लागेल. दुखावलेल्या माणसाची क्षमा मागावी लागेल. आपल्या वागण्यात बदलही करावा लागेल.
या दसऱ्याला स्वतःलाच विचारू या—
“माझ्या कोणत्या सवयीमुळे मला आणि माझ्या माणसांना त्रास होतो? ती बदलण्यासाठी आजपासून मी काय करणार?”
रागात अपशब्द बोलणे थांबवणार का? झालेली चूक मान्य करणार का? कोणाची क्षमा मागणार का? दुसऱ्याच्या यशाचे मनापासून कौतुक करणार का? गैरसमज मनात ठेवण्याऐवजी मनमोकळा संवाद साधणार का?
सगळे बदल एका दिवसात होतीलच असे नाही. पण एका सवयीपासून सुरुवात तर करता येईल! रात्री झोपताना स्वतःला विचारता येईल—“आज मी कुठे संयम राखला? कुठे चुकलो? उद्या काय सुधारता येईल?”
बाहेरचा रावण एका संध्याकाळी जळतो; आतल्या रावणावर विजय मिळवण्यासाठी मात्र रोज स्वतःवर काम करावे लागते!
विजयादशमी हा विजयाचा सण आहे. मग आपल्याला हरवणाऱ्या सवयींना हरवण्याची तयारीही या निमित्ताने करू या!
द्वेषाऐवजी आपुलकी, अहंकाराऐवजी नम्रता, संशयाऐवजी संवाद आणि अपमानाऐवजी सन्मान आपल्या वागण्यात आणू या.
आपट्याची पाने सोने म्हणून देताना चांगल्या विचारांचे आणि माणुसकीचे सोनेही एकमेकांना देऊ या. आपल्या सहवासात माणसांना धीर मिळू दे, आनंद मिळू दे, जगण्याचे बळ मिळू दे!
आपल्या आतल्या दुर्गुणांवर सद्गुणांचा विजय होवो. आपल्या कष्टांचे सोने होवो. आयुष्यात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो!
दसरा व विजयादशमीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🏻🌹
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक, यूट्यूबर, व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
📱 ९७६७७०४६०४
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
संवादाची सुरुवात सकारात्मक करणेच फायदेशीर ठरू शकते!
डॉ. हनुमंत भोपाळे
प्रत्येक व्यक्ती आपापले अनुभव, भावना, विचार, कल्पना, पूर्वग्रह, दृष्टिकोन, आवडीनिवडी, माहिती, ज्ञान आणि अज्ञान सोबत घेऊन जगत असते. त्यामुळे एकाच प्रसंगाकडे पाहण्याची प्रत्येकाची नजर वेगळी असू शकते. आपल्याला जे दिसते, तेच पुढच्याला दिसेल असे नाही. आपल्याला जे पटते, तेच त्यालाही पटले पाहिजे, असा आग्रह धरला की संवादात अडथळे निर्माण होतात.
म्हणूनच ‘माझंच खरं!’ म्हणण्यापेक्षा ‘खरं ते माझं!’ अशी भूमिका घेतली तर निश्चितच फायदा होतो. आपली चूक सुधारण्याची संधी मिळते. गैरसमज दूर होऊ शकतात. निदान संपूर्ण बाजू ऐकून न घेताच निर्णय दिल्याचा पश्चात्ताप तरी टाळता येतो.
आता हेच पाहा ना! एखाद्याशी बोलण्याची सुरुवातच आपण “तुमचं नेहमी असंच असतं!”, “तुम्हाला काही समजतच नाही!” अशा शब्दांनी केली तर पुढचा माणूस आपलं म्हणणं शांतपणे ऐकेल का? तोही स्वतःची बाजू सावरण्याचा किंवा आपल्यावर उलट आरोप करण्याचा प्रयत्न करणार नाही का?
त्याऐवजी, “तुमच्याशी एक गोष्ट शांतपणे बोलायची आहे”, “नेमकं काय झालं ते मला समजून घ्यायचं आहे”, “आपण दोघांनी मिळून यावर मार्ग काढू या”, अशी सुरुवात केली तर संवादाला वेगळं वळण मिळू शकतं.
सकारात्मक सुरुवात करणे म्हणजे चूक झाकणे किंवा खोटे कौतुक करणे नव्हे. सत्य सांगतानाही समोरच्याचा सन्मान जपणे होय. मुद्दा ठामपणे मांडता येतो; त्यासाठी माणसाला दुखावणारे शब्द वापरावेच लागतात असे नाही.
विचारपूर्वक, विवेकाने जगण्यातून व्यक्तिमत्त्वाला उंची लाभते. आत्मपरीक्षण करत जगत गेलो तर आपल्या आचार-विचारांतील विसंगती लक्षात येतात. त्या कमी करण्याचा मार्ग सापडतो. मात्र, विसंगतीची जाणीव झाली म्हणजे ती आपोआप दूर होते असे नाही. त्यासाठी चूक मान्य करण्याची आणि वागण्यात बदल करण्याची तयारी लागते.
स्वतःला प्रश्न विचारून त्यांची प्रामाणिक उत्तरे शोधत जगू लागलो तर अनेक अडचणी टाळता येतात. निर्माण झालेल्या समस्यांतूनही मार्ग काढता येतो.
आपल्याजवळ जे असते, तेच आपण इतरांना देत असतो. मनात जिव्हाळा असेल तर शब्दांत आपुलकी येते. मनात सतत राग, तिरस्कार आणि संशय असेल तर त्याचे प्रतिबिंबही बोलण्यात दिसते. आपण इतरांना काय देत आहोत, यावर आपल्या संबंधांचे स्वरूप ठरत जाते. आपल्या वागण्याच्या आठवणी माणसांच्या मनात राहतात. म्हणून न्यायाने, संवेदनशीलतेने आणि हितकारक पद्धतीने जगण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरतो.
एक जण मला म्हणाला, “सर, आपण कितीही चांगलं वागलो तरी दुसरे चांगलं वागत नाहीत. त्यामुळे मीही आता चांगलं वागणं सोडून दिलं आहे!”
बोलताना त्याचा श्वास वाढला होता. आवाजात राग होता. मनात साचलेली नाराजी शब्दांतून बाहेर पडत होती.
मी त्याला म्हणालो, “ठीक आहे. कसं बोलावं, कोणती कृती करावी, कोणता निर्णय घ्यावा, हा तुमचा प्रश्न आहे. पण तुम्ही घेतलेला निर्णय तुम्हाला आनंद देतोय का? समाधान मिळतंय का? तुमचं जगणं अधिक सुखकर झालंय का?”
तो काही क्षण शांत राहिला.
मी पुढे विचारलं, “समजा, आयुष्याचे अगदी मोजके दिवस उरले आहेत, असं तुम्हाला कळलं, तरीही तुम्ही उरलेला वेळ अशाच रागात घालवाल का? की आपल्या माणसांशी मनमोकळं बोलाल?”
त्यावर तो म्हणाला, “खरं सांगायचं तर मी वागतो ते चुकीचं आहे, हे मला कळतं. पण माझे मित्र म्हणतात, ‘तू वागतोस तेच बरोबर आहे!’ ते अनेक उदाहरणं देऊन मला पटवून देतात. आता अशा वागण्याची सवय झाली आहे. माझी ओळखही तशीच झाली आहे. मी बदललो तर मित्र नावं ठेवतील. दूर जातील. दुसरे मित्र मिळतीलच याची खात्री काय? मित्रांशिवाय मला जगणं शक्य नाही!”
हे ऐकल्यानंतर मी त्याला म्हणालो, “मित्रांची साथ महत्त्वाची आहेच. पण तुमच्या मनाला न पटणाऱ्या वागण्याला पाठिंबा मिळतोय म्हणून ते तुमच्यासाठी हितकारक ठरतं का? तुमच्या रागाला खतपाणी घालणं आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडायला मदत करणं, यात फरक आहे ना?”
आपल्या प्रत्येक कृतीला मान डोलावणारा माणूसच आपला हितचिंतक असतो असे नाही. कधी आपल्या चुका प्रेमाने दाखवणारी व्यक्ती आपले अधिक भले करत असते. तिला ऐकून घेण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.
खरं तर आपण ज्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतो, त्या दिशेने प्रयत्न करणारी माणसं आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी नव्या माणसांना भेटण्याची, विधायक उपक्रमांत सहभागी होण्याची तयारी हवी. जुने संबंध जपताना त्यांतील चुकीच्या आग्रहाला नकारही देता आला पाहिजे.
त्याचबरोबर आपण स्वतःचाही मित्र बनलं पाहिजे. स्वतःसोबत शांतपणे राहता आलं पाहिजे. प्रत्येक क्षणी कोणीतरी आपल्या सोबत असलंच पाहिजे, आपल्या मताला दुजोरा दिलाच पाहिजे, ही अपेक्षा आपल्याला परावलंबी बनवते.
वाचन, लेखन, आवडीची कला, मनाला मानवणारी ध्यानसाधना, निसर्गात फेरफटका किंवा एखाद्या विधायक उपक्रमातील सहभाग यांतून स्वतःसोबत वेळ घालवण्याची सवय लावता येते. मनातील विचार ओळखण्यासाठीही असा वेळ उपयोगी पडतो.
दुसरे चुकीचे वागतात म्हणून आपणही तसेच वागायचे, हा निर्णय घेताना थोडं थांबून पाहायला हवं. त्यांच्या चुकीची किंमत आपण आपल्या मनःशांतीतून का चुकवायची? त्यांच्या वागण्यामुळे आपण आपली मूल्यं का सोडायची?
चांगलं वागणं म्हणजे सगळं सहन करत राहणंही नव्हे. अन्यायाला विरोध करता येतो. चुकीची मागणी नाकारता येते. वारंवार अपमान होत असेल तर संबंधांत आवश्यक अंतरही ठेवता येते. हे करतानाही आपली भाषा सभ्य आणि भूमिका स्पष्ट ठेवता येते.
विधायक जगण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रयत्न सुरू केले की बदलाची शक्यता निर्माण होते. प्रत्येक प्रयत्नाला लगेच यश मिळेलच असे नाही. आपण पेरलेले सगळेच उगवेल असेही नाही. पण म्हणून पेरायचेच नाही का? चांगल्या संबंधांसाठीही विश्वास, आदर, संयम आणि सहकार्य पेरावंच लागतं.
म्हणून अधूनमधून स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत.
मी जे बोलतोय ते सत्य आहे का? ते सांगण्याची माझी पद्धत योग्य आहे का? योग्य मुद्दा मांडताना मी अपमानास्पद भाषा तर वापरत नाही ना?
समोरच्या व्यक्तीच्या जागी मी असतो तर मला कसं वाटलं असतं? माझ्याशी कोणी याच शब्दांत बोललं तर मी ते सहज स्वीकारलं असतं का?
मी माझी बाजू सांगण्याइतक्याच लक्षपूर्वक त्याची बाजू ऐकतोय का? त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच त्याचा हेतू ठरवून टाकतोय का?
मी प्रामाणिकपणे, माझ्या क्षमता आणि कौशल्यांनुसार सहकार्य करतोय का? की थोडं देऊन त्याबदल्यात खूप काही मिळावं, या अपेक्षेने वागतोय? ‘आवळा देऊन कोहळा मिळावा’ अशी अपेक्षा तर ठेवत नाही ना? अपेक्षेइतकं परत मिळालं नाही म्हणून दुःखी होतोय का?
पुढच्याचंच चुकतंय आणि माझं काहीच चुकत नाही, असं मी गृहीत धरलंय का? माझी चूक दाखवल्यानंतर मी ऐकून घेतो का? आवश्यक असेल तेव्हा क्षमा मागतो का?
मैत्री आणि चांगले संबंध टिकवण्यासाठी संयम, सहनशीलता आणि क्षमाशीलता लागते. हे गुण मी माझ्या वागण्यात आणतोय का? की त्यांची अपेक्षा फक्त इतरांकडून करतोय?
या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्यांना दाखवण्यासाठी द्यायची नाहीत. स्वतःचं जगणं सुधारण्यासाठी शोधायची आहेत.
प्रत्येक संवादात आपल्याला दोन गोष्टींची काळजी घेता येते—आपला मुद्दा स्पष्टपणे मांडण्याची आणि समोरच्याला ऐकून घेण्याची. मतभेद असले तरी हा प्रयत्न करता येतो.
“तुमचं चुकतंय!” म्हणण्याआधी “तुमची बाजू मला समजून घ्यायची आहे,” असं म्हणून पाहू या. “तुम्ही कधीच ऐकत नाही!” म्हणण्याऐवजी “माझं म्हणणंही थोडं ऐकून घ्याल का?” असं विचारून पाहू या.
सकारात्मक सुरुवात केली म्हणून प्रत्येक संवाद आपल्या मनासारखा होईलच असे नाही. पण समजून घेण्याची आणि मार्ग शोधण्याची शक्यता निश्चित वाढते.
संवादाची सुरुवात अशी करू या की पुढच्याला आपल्याशी बोलावंसं वाटेल. आपला मुद्दा मांडू या; त्याचबरोबर त्याचं मनही समजून घेऊ या. संबंध सुधारण्याची सुरुवात आपल्या एका वाक्यापासूनही होऊ शकते!
डॉ. हनुमंत भोपाळे
समुपदेशक, यूट्यूबर, व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
मोबाईल : ९७६७७०४६०४
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
ओंजळ भावनेची
जगताना काही माणसांचं काहीतरी आपल्याला भावतं. कुणाचं बोलणं, कुणाचं वागणं, तर कुणाचं न बोलताही आपल्या पाठीशी उभं राहणं…
काही जण हे भावलेलं व्यक्त करतात. पण बरेच जण करत नाहीत. कुणाला वेळ मिळत नाही. कुणाला शब्द सापडत नाहीत. कुणाला वाटतं, ‘‘काय सांगायचं? त्यांना माहीतच आहे की!’’ तर कुणाला मनातला संकोच बोलू देत नाही. ‘समोरच्याला काय वाटेल?’ या एका प्रश्नापाशी कितीतरी भावना मनातच थांबून राहतात…
आणि जे व्यक्त होतात, ते आठवणी सांगतात, अनुभव मांडतात. आपल्या जगण्यात दुसऱ्या माणसानं काय दिलं, हे मनापासून सांगतात. त्यातून एखाद्याच्या आयुष्याचा आपल्याला माहीत नसलेला पैलू समोर येतो. एखाद्या कृतीमागचा विचार कळतो. माणसामाणसांतलं प्रेरणेचं नातं उलगडत जातं.
अशा आठवणींत ज्ञानाचे कण सापडतात. कुणाच्या क्षमता लक्षात येतात, कुणाची कौशल्यं उमगतात. शहाणपण शिकवणारे क्षण पुन्हा जिवंत होतात. आणि त्या वेळी साधा वाटलेला एखादा प्रसंग आपल्या आयुष्याला किती मोठं वळण देऊन गेला, याची जाणीव होते.
खरंच, आपण एकटे कुठे घडतो?
आपल्याला घडवण्यात कितीतरी हात असतात. कुणी बोट धरून चालायला शिकवतं. कुणी विचार करायला शिकवतं. कुणी चूक दाखवतं, तर कुणी चूक झाल्यावरही जवळ घेतं. कुणी आपल्याच क्षमतेची आपल्याला ओळख करून देतं. आणि कुणी कठीण प्रसंगी फक्त एवढंच म्हणतं, ‘‘तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी!’’ त्या एका वाक्यानं पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळतं…
अशी माणसं आणि त्यांनी दिलेलं संचित शब्दांत जपून ठेवावं, अशी मनापासून इच्छा आहे. मला जे भावलं, त्यातलं काही इतरांच्याही उपयोगी पडावं. कुणाला प्रेरणा मिळावी. कुणाला आपल्या आयुष्यातल्या अशाच माणसांची आठवण व्हावी. आणि राहून गेलेलं बोलणं, आज तरी बोलावंसं वाटावं… एवढ्यासाठीच हा लेखनप्रपंच.
या लेखनात माझे आईबाबा आहेत. माझे गुरू आहेत. माझे मित्र आहेत. माझ्या जगण्यात आलेली, मनात घर करून राहिलेली आणि माझ्या घडण्यात आपापल्या परीनं वाटा उचलणारी सगळी माणसं आहेत.
त्यांच्या आठवणी सांगताना माझ्या जगण्याचाही काही भाग उलगडेल. त्यांच्या कृतीतून मी काय शिकलो, त्यांच्या सहवासानं माझ्या विचारांना कोणती दिशा मिळाली, हेही मांडण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्येक आठवणीत शिकवण असेलच, असं नाही. काही आठवणी केवळ आपलेपणाच्या असतील. काही हसवतील. काही डोळे पाणावतील. तर काही स्वतःकडे पुन्हा एकदा पाहायला लावतील…
मनात साचलेलं हे सगळं शब्दांच्या ओंजळीत घ्यावं, ज्या माणसांनी माझं जगणं समृद्ध केलं, त्यांच्याविषयीचा जिव्हाळा व्यक्त करावा, या हेतूनं हे लेखन करणार आहे…
हे लेख तुम्ही का वाचावेत?
मला वाटतं, या लेखांतून कदाचित तुमच्याच भावनांना शब्द मिळतील. वाचताना नकळत मनात येईल, ‘‘अरे, माझ्याही मनात अगदी असंच होतं…’’ आणि कदाचित तुम्हालाही वाटेल, आपणही लिहावं… आपल्या आयुष्यातल्या अशाच माणसांविषयी!
त्या कृतज्ञ जाणिवेतूनच ही—‘ओंजळ भावनेची’…
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक, यूट्यूबर, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
संवेदनशीलता घर करते तिथे माणुसकी उरते…
माझा एक मित्र आजकाल कठोर वागायला लागला आहे, असं मला कळलं.
तो एके दिवशी अचानक भेटला. पूर्वीसारखी त्याच्या जगण्यात सहजता नव्हती. आपलेपणा दिसत होता; पण तो कृत्रिम बनला होता. बोलत होता; पण त्यामध्ये माया, जिव्हाळा दिसत नव्हता. त्याच्या वागण्यातला कोरडेपणा मला आश्चर्यचकित करून गेला.
इतका संवेदनशील माणूस, इतका माणुसकीचा माणूस असा कसा झाला, असा मला प्रश्न पडला. मी अस्वस्थ झालो.
त्याला विचारलं, “आता कविता करतोस की नाही?”
तो म्हणाला, “माझ्यातल्या कवीचा मी खून करून टाकला…
मित्रा, माझ्या माणुसकीवर, माझ्या चांगुलपणावर इतके कठोर वार झाले… माझ्या काळजाला अशी छिद्रं पडलीत…”
मी म्हणालो, “मित्रा, मी हे समजू शकतो. वाराचं दुःखही लक्षात घेऊ शकतो. तुझा रागही समजू शकतो…
सगळ्यांनाच कमी-अधिक प्रमाणात दुःख होतं, राग येतो. पण तो आपल्या जगण्याचा भाग होता कामा नये, याची आपण काळजी घेतली पाहिजे मित्रा…
मलाही राग येतो. मी तेव्हाच जागा होतो आणि परत माणुसकीच्या ओलाव्यानं वागायला सुरुवात करतो.
मध्ये-मध्ये माझ्यातही असंवेदनशीलता खोपा करू पाहते. मी तिला घर करू देत नाही. तिनं आणलेलं साहित्य फेकून देतो…
तूही तसं कर…”
दुःख वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यावर ज्यांचं हृदय पिळवटून जातं, ती माणसं संवेदनशील असतात…
संवेदनशीलता घर करते तिथे माणुसकी उरते…
“तो एकटा जगतोय. एकटेपणाचं दुःख काय असतं, हे मी जाणतो…”
असं फक्त कोरडेपणानं म्हणणं… हे म्हणणं फक्त ओठांतून असेल, तर असंवेदनशीलता होय…
जेव्हा हेच म्हणणं पोटातून येतं… मनापासून, हृदयापासून येतं… मन हेलावतं… नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात…
ओठांतूनच नव्हे, पोटातून शब्द निघतात, तिथे संवेदनशीलतेचं दर्शन घडतं… माणुसकी दिसून येते…
आपण म्हणू शकतो,
जोपर्यंत दुसऱ्यांच्या दुःखानं डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, तोपर्यंत माणसात माणुसकी उरते…
दुसऱ्यांची वेदना, दुःख जेव्हा आपलं वाटतं, त्यासाठी शक्य ती सकारात्मक कृती आणि उक्ती माणूस करू लागतो, तेव्हा जगण्याला उंची प्राप्त होते…
काही माणसं तर प्राण्यांनाही आपल्यासारखंच समजतात. त्यांनाही मन आहे, त्यांनाही वेदना असतात, ही जाणीव जिवंत ठेवून जगतात.
एवढंच नव्हे, तर झाडाझुडपांनाही जपतात. त्यांच्या जगण्याचीही काळजी घेतात…
तिथे संतत्वाचं दर्शन घडतं…
अशी माणसं दुर्मीळ असतात…
अशा माणसांच्या सहवासात आपल्याला त्यांच्या वैचारिक, भावनिक खोलीचं, उंचीचं दर्शन घडू शकतं…
यासाठी आपल्यात माणुसकी शिल्लक असावी लागते…
संत तुकोबारायांचा उद्गार आहे—
“बुडती हे जन न देखवे डोळा। म्हणून कळवळा येत असे॥”
“काय करू धरूनिया भीड…”
हा त्यांचा उद्गार त्यांच्या संतत्वाचं, त्यांच्या भावनिक उंचीचं, वैचारिक उंचीचं आपल्याला दर्शन घडवतो आणि आपलं मन त्यांच्यासमोर सहजच नतमस्तक होतं…
पण काही माणसं इतरांच्या प्रत्येक कृती-उक्तीकडे पाहताना म्हणतात,
“मला काय त्याचं…” “मला काही देणंघेणं नाही…”
दुसऱ्यांचा चांगुलपणा आपल्या स्वार्थाच्या आड येत असेल, तर “मला काय त्याच्या चांगुलपणाला जाळायचं आहे?” असा विचार करून माणसं चांगुलपणावर वार करतात…
तेव्हा तिथे संवेदनशीलतेचा खून झालेला असतो आणि चांगुलपणावर बलात्कार…
म्हणून मित्रा, मध्ये-मध्ये आपल्यातही असंवेदनशीलता खोपा करू पाहते, तेव्हा जागं व्हायला हवं. तिला घर करू देता कामा नये. तिनं आणलेलं साहित्य फेकून द्यायला हवं…
दुसऱ्यांची वेदना, दुःख आपलं वाटायला हवं. त्यासाठी शक्य ती सकारात्मक कृती आणि उक्ती आपल्या हातून घडायला हवी…
संवेदनशीलता घर करते तिथे माणुसकी उरते…
प्रा. डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
समुपदेशक, यूट्यूबर, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
मोबाईल : ९७६७७०४६०४
ई-मेल : hanumantbhopale@gmail.com
3 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Hanumant Bhopale
प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर द्यायलाच हवे का?
दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे असतात की, सुरुवातीला आपला त्यांच्याशी काहीही संबंध नसतो. कुणीतरी काहीतरी बोलते, टोमणा मारते किंवा चिथावणी देते. आपण प्रतिसाद दिला नाही, तर तो प्रसंग तिथेच थांबू शकतो. पण “याला उत्तर दिलेच पाहिजे,” असे वाटते आणि आपण क्रिया-प्रतिक्रियांच्या खेळात उतरतो.
“मी गप्प बसलो तर लोक मला कमजोर समजतील.”
“त्याला वाटेल, त्याचेच खरे आहे.”
“मी काही कमी नाही, हे त्याला दाखवायलाच हवे!”
अशा विचारांनी सुरुवात होते. मग समोरच्याच्या एका शब्दाला आपण दोन शब्द सुनावतो. तो आणखी बोलतो. आपणही आवाज चढवतो. आधी त्या प्रसंगाशी संबंध नसलेला माणूसही अविवेकी बोलू लागतो. स्वतःची बाजू मांडण्याऐवजी समोरच्याला दुखावण्यासाठी शब्द शोधू लागतो.
मग ही मालिका सुरू होते. एकाचे बोलणे दुसऱ्याच्या बोलण्याला, एकाची कृती दुसऱ्याच्या कृतीला खतपाणी घालते. यात वेळ जातो, मनःशांती जाते आणि कधी संबंधही तुटतात.
नंतर वाटते, “यात आपण पडायलाच नको होते!”
पण तोपर्यंत आपणही काही दुखावणारे शब्द बोललेले असतात. त्यामुळे केवळ समोरच्याची चूक सांगून मोकळे होता येत नाही. आपल्यालाही आपल्या वागण्याची जबाबदारी घ्यावी लागते.
जिथे आगच नाही, तिथे टाकलेला कचरा जळत नाही. पण आधीच धग असलेल्या ठिकाणी तोच कचरा पडला, तर आग भडकू शकते. आपल्या मनातील राग, अहंकार आणि प्रत्येक वेळी स्वतःचेच खरे ठरवण्याची धडपड हीदेखील अशी धग असते. समोरच्याचे चिथावणीचे शब्द त्या धगीला मिळाले की वाद पेटतो.
समोरच्याने काय बोलावे, हे नेहमी आपल्या हातात नसते; पण त्याला कसे उत्तर द्यावे, याबाबत आपण निवड करू शकतो.
लोकव्यवहारात एक रांगडी म्हण वापरली जाते—घाणीवर दगड मारला की शिंतोडे आपल्यावरही उडतात. काही वादांत उतरल्याने प्रश्न सुटण्याऐवजी आपलेच नुकसान होते, असा तिचा आशय आहे. मात्र हा दृष्टान्त एखाद्या माणसाला घाण समजण्यासाठी वापरू नये. त्यातून निष्फळ आणि अपमानकारक वादात अडकण्याचे नुकसान समजून घ्यावे.
आपला विरोध चुकीच्या वर्तनाला असायला हवा. “तू मूर्ख आहेस,” असे म्हटले की व्यक्तीवर हल्ला होतो. त्याऐवजी “तुमचे हे बोलणे मला मान्य नाही,” असे सांगितले तर आपली भूमिका स्पष्ट होते.
“तुम्हाला मतभेद मांडता येतील; पण अपमानास्पद भाषेत बोललात तर मी हा संवाद थांबवेन,” असेही शांतपणे सांगता येते.
ठामपणे बोलण्यासाठी आक्रमक होण्याची गरज नसते.
कधी मनातल्या मनात “तूच शहाणा आणि तुझंच खरं!” म्हणत वाद सोडून देण्यात शहाणपण असू शकते. मात्र तेच शब्द उपरोधाने उच्चारले, तर पुन्हा वाद पेटू शकतो. माघार घेतानाची भाषाही शांत असावी.
“तुमचे म्हणणे ऐकले. माझे मत वेगळे आहे. आपण इथे थांबूया.”
“हा संवाद आता उपयोगाचा राहिलेला नाही. आपण नंतर बोलूया.”
एवढे सांगून बाजूला होता येते. समोरच्याला आपले म्हणणे पटलेच पाहिजे, ही अट सोडली की अनेक वादांतून बाहेर पडणे सोपे होते.
माघार म्हणजे प्रत्येक वेळी चूक मान्य करणे नाही. कधी ती आपल्या वेळेची, प्रतिष्ठेची आणि मनःशांतीची काळजी असते. आपल्याला काय पटते, हे स्पष्ट असतानाही निष्फळ वादातून बाहेर पडता येते.
रागाच्या भरात लगेच उत्तर देणे टाळता आले, तर मोठे नुकसान टाळता येऊ शकते. थोडा वेळ थांबा. श्वास स्थिर करा. आवश्यक असेल तर त्या जागेपासून काही वेळ दूर व्हा.
“आत्ता आपण दोघेही चिडलेलो आहोत. शांत झाल्यावर बोलूया,” असे सांगता येते.
प्रतिक्रिया पुढे ढकलणे म्हणजे प्रश्न टाळणे नाही. प्रश्न समजून घेण्यासाठी आणि योग्य शब्द निवडण्यासाठी स्वतःला वेळ देणे आहे.
उत्तर देण्यापूर्वी स्वतःला विचारूया—
“माझ्या उत्तराने प्रश्न सुटणार आहे की आणखी वाढणार आहे?”
“मला माझी बाजू मांडायची आहे की समोरच्याला हरवायचे आहे?”
“हा संवाद पुढे नेण्यात काही अर्थ आहे का?”
हा थोडासा विराम मोठ्या पश्चात्तापापासून वाचवू शकतो.
सोशल मीडियावरही असे प्रसंग वारंवार घडतात. आपण एखादा विचार मांडतो. त्यावर कुणीतरी मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी वैयक्तिक टिप्पणी करते. आपण खुलासा करतो. ती व्यक्ती पुन्हा चिथावणी देते. मग तासन्तास उत्तरांची देवाणघेवाण सुरू राहते.
फोन बाजूला ठेवल्यानंतरही मनात तोच वाद चालू असतो. आपल्या कामात लक्ष लागत नाही. घरातील माणसांशी बोलतानाही चिडचिड होते.
प्रत्येक टिप्पणीला उत्तर देणे बंधनकारक नाही. प्रामाणिक प्रश्न असेल तर उत्तर द्यावे. गैरसमज असेल तर स्पष्ट करावा. पण वारंवार अपमान करणाऱ्या व्यक्तीला एकदा मर्यादा सांगून संवाद थांबवता येतो. आवश्यक तेथे टिप्पणी हटवणे, ब्लॉक करणे किंवा तक्रार नोंदवणेही योग्य ठरते.
त्याचवेळी आपल्या प्रतिक्रियेमुळे वाद वाढला असेल, तर ते मान्य करायला हवे.
“माझा मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो; पण तो मांडताना मी चुकीचे शब्द वापरले. त्याबद्दल माफी मागतो.”
असे म्हणणे कमीपणाचे नाही. माफी मागताना आपल्या योग्य मुद्द्याचा त्याग करण्याची गरज नसते. आपण वापरलेल्या चुकीच्या पद्धतीची जबाबदारी स्वीकारत असतो.
“सुरुवात त्याने केली,” हे खरे असले, तरी त्यानंतर आपण काय केले, याची जबाबदारी आपलीच असते. समोरच्याने मर्यादा सोडल्या म्हणून आपणही त्या सोडाव्यात, असे नाही.
मात्र अन्याय, वारंवार होणारा अपमान, धमकी किंवा आपल्या हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर केवळ गप्प बसणे पुरेसे नसते. अशा वेळी शांतपणे मर्यादा स्पष्ट करणे, आवश्यक पुरावे जपणे आणि योग्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे मदत मागणे गरजेचे ठरते.
वादाला खतपाणी न घालणे आणि अन्यायाला विरोध करणे, या दोन्ही गोष्टी एकत्र साधता येतात. योग्य वेळी ठाम भूमिका घेणे हाही विवेक आहे.
आणखी एक बाब महत्त्वाची आहे. बाहेरून माघार घेतल्यानंतर मनातूनही त्या वादातून बाहेर पडायला हवे.
प्रत्यक्ष बोलणे थांबले; पण मनात आपण दिवसभर त्याच व्यक्तीशी भांडत राहिलो, तर अस्वस्थता टिकते. “मी असे बोलायला हवे होते,” “पुन्हा भेटला की सुनावणारच,” असे विचार सतत फिरत राहतात.
त्याऐवजी स्वतःला विचारावे, “या प्रसंगातून मला काय शिकायला मिळाले? पुढच्या वेळी कोणती मर्यादा ठेवायची? आता काही कृती करणे आवश्यक आहे का?”
आवश्यक कृती ठरवा आणि आपल्या कामाकडे वळा. मन पुन्हा त्या प्रसंगाकडे गेले, तर स्वतःला सौम्यपणे आठवण करून द्या—“याबाबत मी निर्णय घेतला आहे. आता माझ्या पुढच्या कामाकडे लक्ष देतो.”
कुणीतरी वाद सुरू केला म्हणून आपण त्याचा पुढचा भाग व्हायलाच हवे असे नाही. कुठे बोलायचे, किती बोलायचे आणि कुठे थांबायचे, हे समजणेही विवेकाचे लक्षण आहे.
प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा, कोणत्या वादात उतरायचे हे ओळखणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या शांततेची सूत्रे प्रत्येक चिथावणी देणाऱ्या माणसाच्या हाती देऊ नका.
प्रा. डॉ. हनुमंत भोपाळे
समुपदेशक, यूट्यूबर, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ तथा व्याख्याता
मोबाईल : 9767704604
ई-मेल : hanumantbhopale@gmail.com
3 weeks ago | [YT] | 1
View 1 reply
Hanumant Bhopale
बाहेरून अतूट… आतून तुटलेली!
बाहेरून अतूट वाटणारी
व्यक्ती आतून तुटलेली,
दुभंगलेली असू शकते…
हे आपण कधी तपासले का?
कधी तपासणार आहोत?
तिचा प्रवास आणि त्या प्रवासातील
धक्के, जखमा, वेदना, अश्रू
आणि त्या अश्रूंमागचे दुःख
कधी जाणून घेतले का?
कधी समजून घेतले का?
हसणारा चेहरा पाहिला…
पण त्या हसण्यामागची वेदना पाहिली का?
खंबीरपणे उभे राहणे पाहिले…
पण स्वतःला सावरण्यासाठी
तिला किती धडपड करावी लागते,
हे कधी समजून घेतले का?
तुम्ही खंबीर आहात…
म्हणून तुम्हाला वेदना होत नाहीत,
असे नाही…
तुम्ही सहन करता…
म्हणून तुमच्यावर आणखी भार
टाकत राहायचा का?
तुम्ही मदत मागत नाही…
म्हणून तुम्हाला मदतीची गरजच नाही,
असे समजायचे का?
हे समजून घ्यायला काय आड येते?
आपली घाई?
आपले पूर्वग्रह?
जुने मतभेद?
आपला अहंकार?
की तिच्याबद्दल सगळे आपल्याला माहीत आहे,
हा आपला समज?
आड येणाऱ्या बाबींना
थोडे बाजूला ठेवून
बिनशर्तपणे, मनमोकळेपणाने,
निखळ अंतःकरणाने
समजून घेता आले…
मायेची फुंकर घालता आली…
तर नक्कीच त्याचा फायदा होईल.
समजून घेणे म्हणजे
प्रत्येक गोष्टीला होकार देणे नाही…
मतभेद असू शकतात…
पण मतभेद आहेत म्हणून
एखाद्याच्या वेदनेकडे
पाठ फिरवायची का?
“पण सर, तपासायचे म्हणजे
नेमके काय तपासायचे?”
तपासायचे म्हणजे
उलटतपासणी करायची नाही…
प्रश्नांची सरबत्ती करायची नाही…
नको असताना खासगी गोष्टी
सांगायला लावायच्या नाहीत.
थोडे थांबायचे…
जवळ बसायचे…
विचारपूस करायची…
“कसे आहात?”
या प्रश्नाचे उत्तर
“ठीक आहे…” एवढे आले,
तरी लगेच पुढे निघून जायचे नाही.
“खरंच ठीक आहात ना?”
“काही बोलायचे आहे का?”
“मी ऐकायला तयार आहे…”
एवढे तरी सांगता आले पाहिजे.
आत्ता बोलायचे नसेल,
तर तो अवकाशही द्यायला हवा…
नेहमी बोलणारी व्यक्ती
गप्प का झाली?
सगळ्यांत मिसळणारी व्यक्ती
दूर का राहू लागली?
तिच्या बोलण्यातला उत्साह
कमी का झाला?
काही दुखते आहे का?
काही खुपते आहे का?
काही सांगायचे राहिले आहे का?
काही सहन करता करता
ती थकली आहे का?
हे जाणून घ्यायचे…
पण आपल्याला वाटते तेच खरे,
असे मानायचे नाही.
“पण सर, सगळे आपल्याला कळेल का?”
नाही…
सगळे कळेलच असे नाही.
काही दुःख सांगता येते…
काही दुःख सांगताना
शब्द अडतात…
अश्रू येतात…
काही दुःख
मनातच राहते…
जे कळेल,
जितके कळेल,
तितके समजून घेऊ…
जे कळले नाही,
त्याबद्दल अंदाज करून
दोष देत बसू नको.
कुणी आपली वेदना सांगत असेल,
तर लगेच म्हणू नका—
“त्यात काय एवढे?”
“तुम्हीच जास्त विचार करता…”
“तुमच्यापेक्षा माझे दुःख मोठे आहे…”
असे सांगून
समोरच्याचे दुःख लहान करू नका…
दुःखाची स्पर्धा नसते…
ज्याची जखम,
त्याला तिची वेदना जाणवते…
आपण त्या जागी नाही,
म्हणून त्याला काहीच होत नाही,
असे कसे म्हणता येईल?
आणखी एक गोष्ट…
कुणी विश्वासाने
आपली वेदना सांगितली…
तर ती इतरांच्या चर्चेचा
विषय करू नका…
त्याने मन उघडले आहे…
त्याचा विश्वास जपायला हवा…
त्याच्या मनाला
आणखी जखम होणार नाही,
याची काळजी घ्यायला हवी…
समजून घेण्यासाठी
प्रत्येक गोष्टीचे उत्तर
आपल्याकडे असायला हवेच असे नाही.
कधी शांतपणे ऐकणे…
कधी सोबत बसणे…
कधी “मी आहे…” एवढे सांगणेही
आधार देणारे ठरू शकते.
पण आधार
फक्त बोलण्यातूनच का द्यायचा?
“काही लागले तर सांगा…”
एवढ्यावर थांबू नका…
“डॉक्टरांकडे सोबत येऊ का?”
“तुमचे एखादे काम करू का?”
“थोडा वेळ तुमच्याजवळ बसू का?”
असेही विचारता येईल…
आपल्याला सोयीची मदत
देण्यापूर्वी
त्याला कोणती मदत हवी आहे,
हे समजून घेता येईल…
आधार आपल्या कृतीतूनही
जाणवायला हवा…
शरीरातील त्रास
डॉक्टरांकडून तपासून घेऊ या…
मनातील त्रास
गरजेनुसार समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
किंवा मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने
समजून घेऊ या…
योग्य उपचार करू या…
गोळ्या, औषधे आणि इतर उपचार
यांची गरज असू शकते…
त्यांचा उपयोगही होतो.
पण उपचार सुरू आहेत म्हणून
आपली जबाबदारी संपली,
असे समजू नये.
औषधांसोबत
माणसांची साथही हवी…
विचारपूस हवी…
आपुलकी हवी…
ऐकून घेणारे कुणीतरी हवे…
भार हलका करणारे
कुणीतरी हवे…
ही साथ देण्याचा यथाशक्ती प्रयत्न
नातेवाईक, मित्र आणि सहकारी
यांनी करायला हवा.
काही जणांकडे
एखादी व्यक्ती गेल्यानंतर
पश्चात्ताप करायला वेळ आहे…
श्रद्धांजली वाहायला,
अश्रू ढाळायला,
आठवणी काढायला वेळ आहे…
पण जिवंतपणी
समजून घ्यायला,
विचारपूस करायला,
धीर द्यायला,
आधार द्यायला वेळ नाही…
“भेटायला पाहिजे होते…”
“बोलायला पाहिजे होते…”
“थोडा वेळ द्यायला पाहिजे होता…”
हे नंतर वाटते…
जे नंतर करावेसे वाटते,
त्यातले थोडे तरी
आत्ता करता येणार नाही का?
आठवणी सांगण्यापूर्वी
आठवणी निर्माण करता येणार नाहीत का?
जिवंत असताना
“तुम्ही आम्हाला हवे आहात…”
हे सांगता येणार नाही का?
“पण सर, लोकांकडे वेळच नाही…
आपल्याला समजून घ्यायची
त्यांची तयारीच नाही…”
ते दुःखद आहे…
पण त्यांच्याकडे वेळ नाही म्हणून
तुम्ही तसेच अस्वस्थ बसणार आहात का?
स्वतःच्या वेदनेकडे
तुम्हीही दुर्लक्ष करणार आहात का?
वेदनेवर उपाय शोधायला
आणि उपचार करायला
स्वतःला वेळ देणार नाही का?
एकाने ऐकले नाही,
तर दुसऱ्या विश्वासू व्यक्तीशी बोलू…
मित्राशी बोलू…
नातेवाइकाची मदत घेऊ…
गरजेनुसार तज्ज्ञांकडे जाऊ…
“मला त्रास होतो आहे…”
“मला थोडी साथ हवी आहे…”
“माझ्यासोबत याल का?”
हे सांगण्यात कमीपणा नाही…
दुःख होते आहे…
म्हणून तुम्ही दुर्बल नाही…
रडू येते आहे…
म्हणून तुम्ही कमी पडलेले नाही…
मदत हवी आहे…
म्हणून तुमची किंमत
कमी होत नाही…
सगळ्यांना सावरणाऱ्या माणसालाही
कधीतरी सावरून घ्यावे लागते…
“आपली पाठ आपल्याला दिसत नाही सर…
काही बाबींसाठी इतरांची साथ हवी…”
बरोबर आहे तुमचे…
सगळे आपल्याला दिसत नाही…
सगळे आपल्याला कळत नाही…
सगळे एकट्याने करता येत नाही…
म्हणूनच माणसाला
माणसाची साथ हवी…
पण साथ हवी आहे,
हे सांगायलाही हवे…
हात पुढे करायला हवा…
मदत मागायला हवी…
मिळणारी योग्य मदत
स्वीकारायलाही हवी…
“लाकडे जमा करून ठेवू शकतो…
अग्नी तरी कुणीतरी
द्यायला हवा ना सर?”
बरोबर आहे… तुमचे…
पण आपण मेल्यानंतरच्या
प्रश्नांत आणि प्रसंगांत जाण्यापूर्वी
जिवंतपणीच्या मरणयातना
कशा कमी करता येतील,
याचा शोध घेऊ या…
आत्ता काय दुखते आहे?
काय खुपते आहे?
कशाचा भार असह्य झाला आहे?
ते आधी समजून घेऊ या…
त्या शोधातून
जे उपाय सापडतील,
ते करून पाहू या…
सगळे दुःख लगेच दूर होईलच,
असे नाही…
पण थोडी वेदना कमी झाली…
थोडा भार हलका झाला…
थोडा धीर मिळाला…
योग्य उपचारांची सुरुवात झाली…
तरी त्याचे मोल आहे.
बाहेरून अतूट वाटणाऱ्या व्यक्तीला
सतत खंबीर राहण्याची
सक्ती करू नका…
तिलाही थकवा येतो…
तिलाही रडावेसे वाटते…
तिलाही कुणाच्या खांद्यावर
डोके ठेवावेसे वाटते…
सगळ्यांना आधार देणाऱ्या व्यक्तीलाही
कधीतरी आधार हवा असतो…
तो आधार
जिवंतपणी देऊ या…
आणि आपल्याला गरज असेल,
तर तो मागूही या…
डॉ. हनुमंत मारोतीराव भोपाळे
9767704604
3 weeks ago | [YT] | 2
View 0 replies
Load more